नमस्कार!
  प्रिय पालकांनो,
आपल्या पाल्याला लाभलेल्या कुटुंबाचा वारसा जपणारी ही एकमेव शाळा उत्कर्ष विद्यालय घडविते आपल्या बाळा “कर्तव्य दक्षस्य कुतो भयम्” या उक्तीप्रमाणे मुलांमध्ये असलेल्या जाणीवांना आकार देण्याची जबाबदारी कर्तव्य म्हणून आम्ही सर्व गुरूजनांनी स्विकारलेली आहे. “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या प्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना स्वतःच्या भाग्याचा निर्माता इथे घडवितो. अहंकारापासून दूर ठेऊन मुलांचे कर्तृत्व फुलविण्यासाठी झटणारे माझे प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद, शिक्षणासाठी सर्व प्रकारच्या सुविधांची कवाडे सदैव खुली करून देणारी व भक्कम आर्थिक पाठबळ देणारी माझी संस्था तसेच शाळेच्या उत्कर्षासाठी नेहमीच मोलाचे सहकार्य करणारा पालक वर्ग आम्हास लाभलेला आहे. विद्यार्थ्यांच्या भावना विकसित करणारे कला-क्रीडा क्षेत्रातील नवोपक्रम, सहशालेय उपक्रम यांसारख्या उपक्रमात सर्वच विद्यार्थ्यांना समान संधी देणारे, वैचारिक स्वातंत्र्य देऊन आकाशाला गवसणी घालणारे, सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी पंखात बळ भरणारे संकुल म्हणजेच आपले उत्कर्ष विद्यालय. आजूबाजूच्या वातावरणात इंग्रजी माध्यमाचे स्तोम असताना देखील आपले बालक आपल्या उत्कर्ष विद्यालयात ज्ञानार्जन करित आहे ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मातृभाषेतून शिक्षण ही नैसर्गिक गोष्ट आहे. मूल जन्माला आल्यानंतर भाषा शिकते तेही शाळेत न जाता. मूल शाळेत गेल्यावरच बोलू लागते असे कुठे घडले आहे का? नाही ना? कुठलीही भाषा समाजात, कुटुंबात वावरताना होणाऱ्या संभाषणातून शिकली जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे शिक्षणाचे सुलभीकरण उत्तम होते आणि विद्यार्थ्यांच्या मनातील सर्व शंकाचे निरसन होते. मराठी माध्यमातून शिकूनही चांगले इंग्रजी येऊ शकते हा विश्वास आपल्या शाळेत निर्माण केला जातो. आपल्या मुलांना कुठेही भरकटू न देता त्यांचे हात कणखर करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. माझ्या या कुटुंबवत्सल उत्कर्ष विद्यालयात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!